
‘महाराष्ट्रात 60 टक्के ओबीसी, व्हीजेएनटीचे आरक्षण असून, या आरक्षणाला सरकारने धक्का लावू नये. खोटय़ा कुणबीकरणाद्वारे शासनाच्या संरक्षणात प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. या सगळ्या गोष्टींसह सगेसोयरेच्या अध्यादेशाला आमचा विरोध आहे,’ असे प्रा. लक्ष्मण हाके यांनी मिरज येथे सांगितले.
दरम्यान, ‘आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. मंडल आयोग टिकला पाहिजे. 60 टक्के ओबीसी, व्हीजेएनटीचे 27 टक्के, एसबीच्या 3 टक्के आरक्षणाला धक्का लावू नये. आमचे आरक्षण टिकलं पाहिजे,’ अशी मागणी प्रा. हाके यांनी केली.
ओबीसी, भटके-विमुक्त, एसबीसी, अल्पसंख्याक समूहांच्या हक्कांसाठी लढणारे उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके, राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश (अण्णा) शेंडगे, नवनाथराव वाघमारे यांनी मिरज येथे धावती भेट दिली. त्यावेळी प्रा. हाके पत्रकारांशी बोलत होते. माजी महापौर संगीता खोत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विठ्ठल खोत, विष्णू माने उपस्थित होते.
प्रा. हाके म्हणाले, ‘ओबीसी हक्क आणि अधिकार आणि रिझर्व्हेशन बचाव या मोहिमेअंतर्गत आम्ही दौरे करीत आहोत. ओबीसी जनबांधवांशी संपर्क करीत आहोत. आज ओबीसींच्या मनात संभ्रमावस्था आहे. कुणबी नोंदणी आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसींचे आरक्षण संपते आहे का? पंचायतराजच्या निवडणुका अजून झाल्या नाहीत. या दृष्टिकोनातून हा दौरा आहे. आम्ही तीन पातळ्यांवर लढाई लढत आहोत. काहीजण ओबीसींचे आरक्षण हिसकावून घेऊ पाहत आहेत; पण ते कदापि होऊ देणार नाही,’ असा इशारा हाके यांनी दिला.