मुंबई उच्च न्यायालयाची बनावट ऑर्डर दाखवून महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका वकिलाला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार या महिला व्यावसायिक आहेत. त्या मूळच्या दिल्लीच्या रहिवासी आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी अलिबाग येथे जमीन विकत घेतली होती. त्या जमिनीवर एकाने दावा केला होता तसेच त्याने रायगड न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्या व्यक्तीच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर महिलेने त्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. त्यासाठी महिलेने एका वकिलाची नियुक्ती केली होती. कामकाज पाहण्यासाठी त्याने दोन कोटी रुपये घेतले होते. दोन अपिलावर सुनावणी पूर्ण झाली होती. त्याचा निकाल आपल्या बाजूने सांगितल्याचे त्याने महिलेला सांगितले होते. तसेच त्या वकिलाने निकालाची प्रत महिलेला पाठवली होती. त्यानंतर त्याने महिलेकडून आणखी पैसे घेतले होते. एप्रिल महिन्यात महिलेने त्या निकालाबाबत एकाकडे अभिप्राय घेतला तेव्हा तिने सर्व कागदपत्रे दाखवली. तसेच ऑर्डरदेखील दाखवल्या होत्या. त्या ऑर्डरची शहानिशा केली. त्या प्रती बनावट असल्याचे लक्षात आले तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाऊन तपासणी केली तेव्हा या प्रकरणात एकही सुनावणी झाली नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.