बिहारचे पूर्णियाचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी लॉरेन्स गॅंग कडून देण्यात आल्य़ाचे बोलले जात आहे. यानंतर पप्पू यादव यांनी बिहार पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
हा धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने दावा केला की, पप्पू यादवच्या अनेक ठिकांणांची तो रेकी करत आहे आणि त्याला जीवे मारणार. एवढेच नाही पप्पू यादव याला सलमान खान प्रकरणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर पप्पू यादव यांनी बिहारच्या डीजीपीला या प्रकरणाची माहिती दिली जेणेकरून त्यावर कारवाई करता येईल.धमकी देणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोई पप्पू यादवशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुरुंगातील जॅमर बंद करून तासाला एक लाख रुपये देत आहे. मात्र पप्पू यादव फोन उचलत नाहीत.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला खुले आव्हान दिले होते. कायद्याने परवानगी दिली तर लॉरेन्स बिश्नोईसारख्या छोट्या-छोट्या गुन्हेगारांचे संपूर्ण नेटवर्क 24 तासांत उद्ध्वस्त करू, असे ते म्हणाले होते. पप्पू यादव यांनी बाबा सिद्दीकी हत्येला लज्जास्पद म्हटले होते. त्यावर त्यांनी लिहिले होते बिहारचे सुपुत्र बाबा सिद्दीकी यांची हत्या अत्यंत दुःखद आहे. भाजपचे सरकार आपल्या पक्षातील अशा प्रभावशाली नेत्यांना संरक्षण देऊ शकत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय होणार? अशी टीकाही केली होती.
मात्र, यानंतर पप्पू यादव यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांना लॉरेन्स बिश्नोईबद्दल प्रश्न विचारला असता ते संतापले. हे सगळे फालतू प्रश्न इथे विचारू नका, असे मी तुम्हाला आधीच सांगितले होते, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रकार परिषदेत पप्पू यादवचा हा व्हिडीओही व्हायरल झाला होता.