राज्याचे माजी मंत्री, अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने प्रचंड खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीनेच सिद्दिकी यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. बिष्णोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर सुरक्षेबाबत कुठलीही हयगय करणार नसल्याचे मिंधे सरकारने जाहीर केले होते. प्रत्यक्षात बिष्णोई टोळी अद्याप सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पडला आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने रविवारी गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप या दोघांसह रात्री पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तुले, 28 जिवंत काडतुसे आणि सहा रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. तसेच शिवकुमार गौतम आणि मोहम्मद जिशान अख्तर या अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. अख्तर हा पटियाला तुरुंगात असताना बिष्णोई टोळीशी संपर्कात आला होता. गुरमेल व धर्मराज या दोघांना न्यायालयाने 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आमदार झिशान सिद्दिकी यांचे वांद्रे-खेरनगर येथे कार्यालय आहे. शनिवारी रात्री बाबा सिद्दिकी तेथे आले. ते रात्री कारने घरी जात असताना तिघांनी गोळीबार केला. त्यात बाबा सिद्दिकीच्या छातीत तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. शिवकुमारने त्यांच्यावर एकूण 6 गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर पळून जाणाऱ्या गुरमेल व धर्मराजला निर्मल नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दाभाडे व अन्य पोलिसांनी जिवाची बाजी लावून पकडले, मात्र शिवकुमार पळून गेला. गुरमेल हरयाणातील, धर्मराज उत्तर प्रदेशचा, तर अख्तर जालंधरचा रहिवासी आहे. हत्येप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नंतर तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवला. दरम्यान, अभिनेता सलमान खान याला असलेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे रविवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
व्हायरल पोस्टचा तपास सुरू
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने घेतल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. हल्लेखोरांनी बिष्णोईच्या आदेशावरून बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या, असे पोस्टवरून स्पष्ट होते. त्यामुळे या पोस्टची मुंबई पोलिसांकडून सत्यता पडताळून पाहिली जात आहे. ही पोस्ट बिष्णोई टोळीनेच केली का, याचा तपास सुरू आहे. सलमान खानच्या घरासमोर झालेल्या गोळीबारानंतर अशाच प्रकारे बिष्णोई टोळीने दावा करताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती.
घराची केली होती रेकी
मारेकरी काही दिवस पुण्यात राहून नंतर कुर्ल्यात आले. त्यांनी काही दिवसांपासून सिद्दिकी यांच्या घराची रेकी केली होती. बाबा सिद्दिकी व त्यांचा मुलगा घराबाहेर कधी पडतात? घरी परत कधी येतात, याची संपूर्ण माहिती त्यांनी काढली होती. त्याआधारे शनिवारचा दिवस निवडून गोळीबार केला. आरोपी मिरची स्प्रेचा वापर करून गोळीबार करणार होते, पण शिवकुमारने स्प्रे मारण्यापूर्वीच गोळीबार केल्याचे उघड झाले आहे.
राज्यात सुरक्षित आहे तरी कोण? – संजय राऊत
मुंबई आणि राज्यात सुरक्षित आहे तरी कोण हे अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावे. सामान्य जनता, महिला, व्यापारी-उद्योगपती, राजकीय कार्यकर्ते, नेते, मंत्री-आमदार सुरक्षित नाहीत. मग गृहखाते करतेय का? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. राज्यपालांनी फडणवीस यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बाबा सिद्दिकी यांची हत्या ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी – भुजबळ
बाबा सिद्दिकी यांना धमक्या येत होत्या अशा बातम्या आल्या. त्यांना सरकारने पोलीस सुरक्षा दिली होती. सुरक्षा दिल्यानंतर पोलिसांचे काम संपले का? या धमक्या कुठून आल्या, कुणी दिल्या होत्या याचा तपास पोलिसांनी का केला नाही? ही नुसती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही तर मुख्यमंत्र्यांचीसुद्धा आहे, असा निशाणा मंत्री छगन भुजबळ यांनी साधला.
फडणवीसांच्या हकालपट्टीची मागणी
राज्यात कायदा-सुव्यवस्था ढेपाळली असून सिद्दिकी यांची हत्या हे ग़ृह खात्याचे अपयश आहे, असा आरोप करत राज्यपालांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली.
मारेकऱ्यांना मिळाले होते तीन लाख रुपये
मारेकऱ्यांना सिद्दिकी यांच्या हत्येसाठी पाच लाख रुपये मिळणार होते. त्यापैकी तीन लाख रुपये गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप, मोहम्मद जिशान अख्तर यांना मिळाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
कॉन्ट्रक्ट किलिंगचा संशय
मारेकऱ्यांना अद्ययावत शस्त्रे कोणी पुरवली? त्यांना स्थानिक पातळीवर कोणी मदत केली? त्यांना राहायला घर व गाडी कोणी दिली? कॉन्ट्रक्ट किलिंग होते का? शस्त्र पुरवण्यासाठी पैसे कोणी दिले? आंतरराष्ट्रीय टोळीशी काही संबंध आहे का? याचा अधिक तपास केला जात आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी 15 पथके तैनात केली आहेत. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कार बुलेटप्रूफ होती!
बाबा सिद्दिकी हे बुलेटप्रूफ कार वापरायचे. बुलेटप्रूफ कार असूनही पिस्तुलातून सुटलेली गोळी कारच्या काचेत घुसून बाबा सिद्दिकी यांच्या अंगावर कशी आदळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा नसल्याचे मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी स्पष्ट केले. सिद्दिकींच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस तैनात असायचे, मात्र गोळीबार झाला तेव्हा एकच पोलीस कर्मचारी तैनात होता.