लातूर – सोयाबीनच्या पिकाला फुटले कोंब, शेतकरी हवालदिल

उदगीर तालुक्यात सततच्या पावसाने गुडसूर व परीसरातील गावांमध्ये धुमाकुळ घातला आहे . त्याचा फटका सोयाबीनच्या शेतीला बसला आहे. सततच्या पावसाने हातात आलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले असून या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. आलेल्या संकटाला तोंड देत शेतकरी सोयाबीनच्या आशेवर होता. पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसाचा जोरदार फटका खरिपाच्या पिकाला बसला आहे सध्या सोयाबीन परिपक्व झाले असुन शेतकरी काढण्याची तयारी करित असताना दररोज मोठा पाऊस पडत आहे. दररोज पडत असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या रानात पाणीच पाणी थांबले असून उभ्या पिकावरील शेगांना कोंब फुटले आहेत.

कमी कालावधीत येणारे पिक म्हणून शेतकरी सोयाबीन घेतात परंतु दररोज पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या बियांना कोंब फुटले आहे . निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेले सोयाबीन कोंब फुटून खराब होत आहे . यंदा शेतकऱ्यांना चांगल्या पिकाची अपेक्षा होती मात्र अखेरच्या टप्प्यात पावसाने झोडपून काढले. रानात पाणी साचल्याने सोयाबीन पूर्ण कुजत असून शेंगाना कोंब फुटलेले आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.