लातूर पोलिसांची 461 वाहचालकांवर कारवाई; 55 मद्यपी वाहन चालकांवर गुन्हे दाखल, साडेतीन लाखांचा दंड वसूल

नववर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणार्‍यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. लातूर जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 55 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भररस्त्यात वाहन उभे करणे, भरधाव वाहन चालवून दुसऱ्याला धोक्यात आणणाऱ्या 461 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून 03 लाख 41 हजार 200 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

नववर्षाचे स्वागत करताना काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात. दारू पिऊन वाहन चालविणारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली. लातूर जिल्ह्याच्या 23 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, संबंधित पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, व पोलीस अंमलदारानी केली.