Latur News – टक्केवारीच्या नादात भर पावसात खड्डे बुजवण्याचा लातूर पॅटर्न

टक्केवारीच्या नादामध्ये काय काम करण्यात येत आहे याकडे ना लोकप्रतिनिधीचे नाही अधिकारी यांचे लक्ष आहे. याचे उदाहरण म्हणजे येथील बार्शी रोडवर सध्या भर पावसामध्ये खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

लातूर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे बार्शी रोडवर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. एका बाजूचा रस्ता खोदण्यात आलेला आहे. तर एकाच बाजूने सध्या वाहतूक सुरू आहे. परंतु हा रस्ता ही प्रचंड खड्डे युक्त आहे. दुचाकी च नव्हे तर चार चाकी वाहन चालवणे अतिशय कठीण झाले आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री लातूर विमानतळावरून परळीसाठी जाणार होते. चुकून काही तांत्रिक कारणांमुळे जर ते रस्तामार्गे गेले तर या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लातूरचा कारभार चव्हाट्यावर येईल म्हणून तातडीने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडूजी करण्याचे काम सुरू झाले असावे.

त्यामुळे भर पावसात सुध्दा रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने भरण्याचे काम सुरू होते. लातूर मध्ये प्रत्येक नवीन कामाचा पॅटर्न म्हणून सांगितले जाते. खरेतर थेट पावसाळ्यात खड्डे बुजवण्याचे काम केले जात नाही परंतू सध्या सुरू असलेले काम पाहिले तर हा एक नवीन लातूर पॅटर्न म्हणावा लागेल. फक्त टक्केवारी साठी हे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.