ST चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस अंगावरून गेली, अपघातात वयोवृद्धाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील बस स्थानकात शुक्रवारी सकाळी 10.15 वाजता औराद ते हुलसुर एसटीसाठी उभे असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्ती एसटीच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

निलंगा तालुक्यातील रहिवासी व्यंकट बळीराम कांबळे (83) हे एसटी स्थानकात गाडी येण्याची वाट बघत होते. गाडी बसस्थानकात लावताना चालकाचे लक्ष नव्हते. चालकाने शेजारी उभे असलेल्या कांबळे यांच्या पायावरून गाडी नेली. तिथे उभे असलेल्या तरूणांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तात्काळ चालकाला थांबवले. चाकाखाली आलेल्या कांबळेना बाहेर काढून औराद येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारासाठी गेलेल्या कांबळे यांचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

बसस्थानकातच चालकाच्या निष्काळजीपणामुळे वयोवृद्ध नागरिकाचा बळी गेल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कांबळे यांच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती कळताच त्यांनी चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.