Latur News – शासकीय कामात अडथळा; दाम्पत्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

अहमदपूर तालुक्यातील सावरगाव(थोट) ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावातील जनसुविधा योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याचे पोलीस संरक्षणात काम चालू होते. यावेळी गावातीलच दाम्पत्याने घरासमोरील रस्ता माझा आहे, मजबुतीकरण करू देणार नाही म्हणत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दाम्पत्याविरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीने ग्रामपंचायत अधिकारी तसेच पोलिसांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ केली. तसेच स्वतः विषारी औषध पिऊन पत्नीससुद्धा पिण्यास सांगून काम बंद करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती-पत्नीविरोधात अहमदपूर पोलिसात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेषेराव शिवमूर्ती कोरनुळे आणि चंद्रकाला ऊर्फ सुनिता शेषेराव कोरनुळे अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.