जळकोट शहरातील मार्केट यार्ड परिसरात अविनाश दत्तात्रय गबाळे यांच्या घरात शनिवारी (11 जानेवारी) सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात कुटुंबातील 5 जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उदगीर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
अविनाश गबाळे यांच्या घरी स्वयंपाकघरात नवीन गॅस सिलिंडर लावण्याची प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान सिलिंडरचे सील काढताच गॅस गळती सुरू झाली. यावेळी स्वयंपाकघरात देवाजवळील दिवा प्रज्वलित असल्याने लागलीच सिलिंडरने पेट घेतला आणि स्फोट झाला. काही क्षणातच आग संपूर्ण घरात पसरली. या दुर्घटनेत अविनाश दत्तात्रय गबाळे (47 वर्षे), मीरा अविनाश गबाळे (35 वर्षे), अमृता प्रशांत गबाळे (32 वर्षे), सर्वज्ञ प्रशांत गबाळे (12 वर्षे) या सर्वांचे पाय भाजले आहेत.
या सर्व जखमींवर डॉ. सचिन सिद्धेश्वरे यांनी तातडीने उपचार केले. तर प्रशांत दत्तात्रय गबाळे (42 वर्षे) हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी उदगीर येथे पाठविण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. उपचारानंतर सर्व जण सुखरुप आहेत, अशी माहिती डॉ. सचिन सिद्धेश्वरे यांनी दिली.