शासन प्रतिबंधीत गुटखा,पानमसाला,सुगंधित तंबाखूची बेकायदेशिररीत्या वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील 5 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक अधिकारी बी.चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पथकातील श्रीमंत आरदवाड, दिपक सोनकांबळे, सिराज शेख, जळबा देगावे, बाबासाहेब गुळवे यांनी तालुक्यातील उदगीर-नळेगाव रस्त्यावरील घरणी पुलावर पोलीस बंदोबस्त लावला. अकराच्या सुमारास (एमएच 2 बीझेड 5721) ही कार आली. कारमध्ये तीन लोक होते. पोलीस पथकाने त्यांची चौकशी केली व पंचासमक्ष कारची झडती घेतली असता त्यात विविध कंपनीचे पानमसाल्याचे डबे आढळून आले. शासन प्रतिबंधीत गुटखा,पानमसाले,सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या मुकेश वाल्मीक लहाने, मनीष शंकरप्रसाद शुक्ला,निखिल मोरेश्वर घोडके हे सर्व वेगवेगळ्या गावाचे रहिवासी असून सध्या लातुर येथे राहत आहेत. यांना ताब्यात घेऊन यांच्याकडून मोबाइल व कारसह 5 लाख 55 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे करीत आहेत.