मनोज जरांगे पाटील यांनी सहा वेळा उपोषण करुनही मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. यामुळे नैराश्येतून पती-पत्नीने विषारी औषध प्राशन केल्याची घटना लातूरमध्ये घडली. पती-पत्नीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. ज्ञानोबा तिडोळे आणि चंचलाबाई तिडोळे अशी पती-पत्नीची नावे आहेत.
ज्ञानेश्वर तिडोळे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नेहमीच सहभागी होत असत. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहा वेळा उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. तसेच मराठ्यांना आरक्षण दिले नाही. याच नैराश्येतून पती-पत्नीने बुधवारी टोकाचे पाऊल उचलले.
तिडोळे दाम्पत्य हे अहमदपूर तालुक्यातील हासरणी येथील रहिवाशी आहेत. बुधवारी अंदाजे रात्री 8.30 ते 9.00 च्या दरम्यान मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सोडल्याची माहिती कळाली. मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याने आपल्या अकरावीत शिकत असलेल्या मुलीचे तसेच दोन लहान मुलांचे आता कसे होईल याची चिंता पती-पत्नीच्या मनात निर्माण झाली.
नैराश्येतून त्यांनी आपली बहीण इंदुबाई तुकाराम हेंडगे, चुलत भाऊ व इतर नातेवाईकांना फोन करून आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहोत असे सांगून विषारी औषध प्राशन केले. वेळीच त्यांना अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.