Latur News – सराईत दुचाकी चोरट्याला अटक, 24 मोटरसायकली हस्तगत

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातून सराईत दुचारी चोराला अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याकडून चोरीच्या 24 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. अमोल नागरवाड असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीची चौकशी केली असता एकूण 17 चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

आरोपीने लातूर, पुणे आणि धाराशिव जिल्ह्यातून एकूण 24 मोटरसायकली चोरल्या. याची किंमत 8 लाख 20 हजार रुपये आहे. पोलीस चौकशीत चाकूर येथील 4, शिरूर अनंतपाळ येथील 3, रेणापूर, देवणी, निलंगा, विवेकानंद, गांधी चौक, अहमदपूर येथील प्रत्येकी 1 मोटरसायकल तर पुणे जिल्ह्यातील 3 आणि धाराशिव जिल्ह्यातील 1 असे एकूण 17 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उर्वरित सात मोटारसायकल संदर्भात तपास सुरू आहे.

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने राहत्या घराजवळून आरोपीला ताब्यात घेतले. चोरी केलेल्या सर्व मोटारसायकली आरोपीने घराजवळ लपवून ठेवल्या होत्या. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी चाकूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, युवराज गिरी, मनोज खोसे, गोविंद भोसले, चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.