Latur News – मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक, एकचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी पाटी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची व  दुचाकीची मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) दुपारी बाराच्या दरम्यान सामोरासमोर जोराची धडक झाली आहे. या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील थोरलेवाडी पाटी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर माल वाहतूक करणारा ट्रक लातूरहून अहमदपूर कडे आणि एका दुचाकीवरून दोन तरुण अहमदपूरवरुन शिरुताजंबद जात होते. याच दरम्यान दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील शेषेराव सोमवंशी (35) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अमर बाबुराव पुट्टेवाड (32) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदरील घटनेची अहमदपूर पोलिसांना माहिती समजताच घटनास्थळी अहमदपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी सागर खराडे, पोलीस निरिक्षक भुसनुर, पोलीस उपनिरिक्षक श्रीमंगल चालक केंद्रे आदींनी भेट दिली