
अहमदपूर तालुक्यातील विमलाबाई देशमुख विद्यालयाच्या परीक्षा केंद्रात 21 विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर चुकीचा दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपलं मुलं पास होणार का? असा प्रश्न त्यांना आता सतावू लागला आहे.
उर्दु माध्यमाच्या इंग्रजी (17) विषय तृतीय भाषा पेपर ऐवजी प्रथम भाषा इंग्रजी (03) ची कृती पत्रिका लिहिण्यास भाग पाडले. त्यामुळे परीक्षार्थींचा चांगलाच गोंधळ उडाला. केंद्र क्रमांक 4064 विमलाबाई देशमुख विद्यालय अहमदपूर यांनी केलेल्या गंभीर चुकीमुळे व ढीसाळपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून परीक्षार्थी चिंताग्रस्त झाले आहेत, असे लातूर विभागीय सचिव शालांत प्रमाणपत्र परीक्षा (2025) यांना एस.ए.जागीरदार हायस्कुल किनगाव, मौलाना आझाद हायस्कुल अहमदपूर, उस्मानिया उर्दु हायस्कुल अहमदपूर, सिराज उल – उलुम उर्दु कन्या हायस्कूल अहमदपुर यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
दरम्यान, हा प्रकार उजेडात येताच शिक्षण विभागाच्या माध्यमातून सावरा-सावरीचे उत्तर देण्यात येत असून अहमदपूर शिक्षण विस्तार अधिकारी बबनराव ढोकळे यांना घटनेबाबत ‘सामना’ने माहिती विचारली असता त्यांनीही हा चुकीचा पेपर विमलाबाई देशमुख विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर वाटण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच सिदीकी कस्टडियम यांना परीक्षा मंडळाला अहवाल पाठविण्याचे सांगितले आहे.