Latur News – भरधाव दुचाकीची उभ्या टेम्पोला धडक, 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

अहमदापूर शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती स्थळाजवळील कासनाळे पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्ग क्र.361 वर एका दुचाकीने मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील एका 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (3 मार्च 2025) संध्याकाळी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी परशुराम राठोड (वय 26 वर्ष) हा तरुण आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त अहमदपूर येथे आला होता. तो आपले काम आटपून अहमदपूर कडून गावाकडे लिंबोटी येथे दुचाकी वरून आपल्या मित्रासोबत जात होता. याच दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.361 वरील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्च महाराज भक्ती स्थळाजवळील कासनाळे पेट्रोल पंपासमोर डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या बाजूला टेम्पो थांबला होता. दुचाकीवरील चालकाला अंदाज न आल्यामुळे भरधाव वेगात दुचाकी टेम्पोला धडकली. या अपघातात दुचाकवरील रवी राठोड (26) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी लातूर येथे पाठवण्यात आले आहे. सदरील अपघाताच्या घटनेची अहमदपूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.