विनेश फोगाट, बजरंग पुनिया हरयाणाच्या आखाड्यात
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची येथे भेट घेतली. हरियाणात फोगाट आणि पुनिया हे अनुक्रमे जुलाना आणि बदली या जागांवरून काँग्रेसच्या तिकीटावर लढण्याची शक्यता आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
हिमाचलमध्ये पक्षबदलू आमदारांना पेन्शन नाही
पक्षबदलू आमदारांचे पेन्शन रोखणारे एक विधेयक आज हिमाचल प्रदेश विधानसभेत मंजूर करण्यात आले. हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. या नवीन विधेयकानुसार, इतर पक्षांमध्ये जाणाऱ्या हिमाचल प्रदेशातील आमदारांना पेन्शन मिळणार नाही. पक्षांतरविरोधी कायद्या अंतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांसाठी हे लागू आहे.
पूजा खेडकरची दोन अपंगत्व प्रमाणपत्रे
दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात अहवाल दाखल केला असून त्यांच्या दोन अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी एक बनावट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ही प्रमाणपत्रे अहमदनगरच्या वैद्यकीय प्राधिकरणाने दिलेली दिसत असली तरी आमच्या सिव्हिल सर्जनच्या कार्यालयातील नोंदीनुसार, या प्राधिकरणाने यापैकी एक अपंगत्व प्रमाणपत्र जारी केलेले नाही, असे प्राधिकरणाने कळवले आहे. त्यामुळे हे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्यता आहे, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
कृष्णजन्मभूमी प्रकरण सुप्रीम कोर्टात
मथुरा येथील कृष्णजन्मभूमी-शाही इदगाह वादाशी संबंधित 18 खटल्यांच्या सुनावणीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात शाही मस्जिद इदगाह व्यवस्थापन ट्रस्टच्या समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हरियाणासाठी काँग्रेस-आप वाटाघाटी सुरूच
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आप यांच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर अशा स्थितीतच आघाडी होईल, असे काँग्रेसचे म्हणणे असून आपला 5 जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. आपला किमान 9 जागांची अपेक्षा आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा आणि काँग्रेसचे प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या.
अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला
भारतीय शेअर मार्केटमध्ये आज किंचित घसरण दिसली. मात्र अमेरिकेत चौफेर विक्रीच्या माऱ्यामुळे अमेरिकन शेअर बाजार धडामकन कोसळला. मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात डाऊ जोन्स 626 अंकांनी तर नॅरडॅक 576 अंकांनी कोसळला. तर आज गिप्ट निफ्टीसह संपूर्ण आशिया खंडात तीव्र पडझड नोंदवली गेली. गिफ्ट निफ्टी 185 अंकांनी घसरून 25.169च्या आसपास ट्रेंड करत आहेत. यूएस फ्युचर्स मार्केटही घसरले असून आशियाई बाजारात निक्केई 1400 अंकांनी आपटला.