क्रीडा नगरीतून शरथ कमल अजून खेळणार
हिंदुस्थानचा महान टेबल टेनिसपटू शरथ कमल पाचव्या ऑलिम्पिक सहभागानंतर निवृत्तीची घोषणा करणार अशी सर्वांना आशा होती, पण तो अजून काही काळ खेळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 42 वर्षीय शरथ आपल्या व्यावसायिक करारांमुळे तो आणखी एक सत्र खेळणार असून त्याला आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी हिंदुस्थानचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये अस्ताना (कझाकिस्तान) येथे खेळली जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचा ध्वजवाहक असलेला शरथ कझाकच्या दौऱ्यापूर्वी या महिन्याच्या अखेरीस चीन स्मॅश स्पर्धेत खेळणार आहे. एवढेच नव्हे तर त्याने दोहा येथे होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतही खेळण्याचे लक्ष्य त्याने समोर ठेवले आहे. त्यामुळे पुढील किमान नऊ महिने एक खेळाडू म्हणून सक्रिय असेल.
इंग्लिश संघातून जोश हल करणार पदार्पण
श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकल्यामुळे निश्चिंत झालेला यजमान इंग्लंडचा संघ आपल्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या संघात एकमेव बदल केला आहे. त्यांनी मॅथ्यू पॉट्सच्या जागी जोश हलची निवड करण्यात आली आहे. मार्क वूड दुखापतीमुळे संघातून बाहेर गेल्यामुळे संघात मॅथ्यू पॉट्सला संधी देण्यात आली, मात्र त्याला दोनच विकेट टिपता आल्या. आता त्याच्या जागी उंचपुऱ्या जोश हलला पदार्पणाची संधी लाभणार आहे. साडेसहा फूट उंचीचा हल 85 ते 90 मैल ताशी वेगाने चेंडू टाकत असल्यामुळे त्याचा मारा लंकन फलंदाजांसाठी फार घातक ठरण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा संघ ः डॅन लॉरेन्स, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), ज्यो रूट, हॅरी ब्रुक, जॅमी स्मिथ (यष्टिरक्षक), खिस व्होक्स, गस अॅटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.
उत्तर प्रदेशमध्ये 18 फुटबॉल स्टेडियम
उत्तर प्रदेशातील युवकांमध्ये फुटबॉलची व्रेझ वाढावी म्हणून राज्य सरकार राज्यातील 18 शहरांमध्ये 18 फुटबॉल स्टेडियमची निर्मिती करणार आहे. तसेच फुटबॉलची अत्याधुनिक सुविधा असलेले 827 फुटबॉल मैदानही तयार करणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील फुटबॉलला लवकरच वेग लाभणार आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी फुटबॉलप्रेमींना आकर्षित करण्यासाठी 18 स्टेडियमचे आश्वासन दिले आहे, पण त्या आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत फुटबॉलप्रेमींच्या मनात आतापासूनच साशंकता निर्माण झाली आहे.