जगभरातील महत्वाच्या घडामोडी

‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात

‘आयएनएस अरिघात’ ही अत्याधुनिक पाणबुडी गुरुवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. त्यामुळे हिंदुस्थानी नौदलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढले आहे. अणुशक्तीवर चालणारी ही दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ‘अरिघात’ म्हणजे शत्रूंचा नाश करणारा. नावाप्रमाणे अरिघातमुळे चीनसारख्या शत्रूला धडकी भरली आहे. आयएनएस अरिघात या पाणबुडीचे वजन सहा हजार टन आहे आणि लांबी 112 मीटर आहे.

अ‍ॅपल कंपनीने दिला 100 कर्मचाऱ्यांना नारळ

अ‍ॅपलने अ‍ॅपल बुक्स अ‍ॅप आणि अ‍ॅपल बुक स्टोरमधील 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यात सर्वाधिक सर्व्हिसेस डिपार्टमेंटमधील कर्मचारी आहेत. कंपनीने घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिशू गृह, 100 मुलांची होणार देखभाल

सर्वोच्च न्यायालयातील महिला कर्मचारी आणि वकील यांच्या छोट्या मुला-मुलींसाठी शिशू गृहाचे गुरुवारी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आधीच्या शिशू गृहात केवळ 30 मुले राहू शकत होती. परंतु आता नवीन शिशू गृहात 100 मुले राहू शकतात. आधीचे शिशू गृह 198 वर्गमीटरचे होते, तर आत्ताचे 450 वर्गमीटरचे आहे. या शिशू गृहात मुलांना खेळण्यासाठी, जेवण करण्यासाठी आणि झोपण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांना आता कोणत्याही चिंतेशिवाय काम करता येणार आहे.

ऐकावं ते नवलच! पैसे खर्च करायचेत, पण सुट्टी मिळत नाही

नोकरी नसेल तर पैशाची चणचण भासते. तर नोकरी असेल तर सुट्ट्यांची चणचण भासते. अमेरिकेतील सेमीकंडक्टर चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एनवीडीयातील कर्मचाऱ्यांची स्थितीसुद्धा अशीच आहे. जगातील सर्वात श्रीमंत कंपनीपैकी एक असलेल्या या कंपनीतील कर्मचारी कोट्यधीश आहेत. त्यांना भरमसाट पगार आहे. परंतु हे पैसे खर्च करण्यासाठी त्यांना सुट्टी मिळत नाही. या ठिकाणी रजा मिळणे फारच अवघड आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडे पैसे खर्च करायलासुद्धा वेळ मिळत नाही. या ठिकाणी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पोर्श, कव्हेंट आणि लॅम्बोर्गिनीसारख्या उच्च श्रेणीतील आलिशान कार आहेत.

आठ जणांचा बळी घेणारा लांडगा जेरबंद

उत्तर प्रदेशातील बहराईच येथे आठ लोकांचा बळी घेणाऱ्या लांडग्याला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले. गेल्या काही दिवसांपासून या लांडग्याने दहशत निर्माण केली होती. रात्री-अपरात्री हा लांडगा नागरिकांवर हल्ला करायचा, लचके तोडायचा. त्यामुळे नागरिकांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या लांडग्याला पकडल्यानंतर त्याला आता वन विभागाच्या केंद्रात नेण्यात आले. बचावकार्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आठ जणांचा बळी घेतल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. लांडग्याला जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

तामीळनाडूमध्ये तीन शाळांना बॉम्बची धमकी

तामीळनाडूमधील इरोड, सलेम आणि तिरुचिरापल्ली जिह्यातील तीन खासगी शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर एकच खळबळ उडाली असून शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुलांना घेण्यासाठी पालकांनी शाळेबाहेर एकच गर्दी केली होती.

नोकरी! युनियन बँकेत 500 जागांसाठी भरती

युनियन बँक ऑफ इंडियाने अ‍ॅप्रेंटिसच्या 500 जागांसाठी भरती सुरू केली आहे. अ‍ॅप्रेंटीस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 20 वर्षे ते जास्तीत जास्त 28 वर्षांपर्यंत असायला हवे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवार 17 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. ही भरती ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे.

चारधाम यात्रेत आतापर्यंत 183 भाविकांचा मृत्यू

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत 183 भाविकांचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्कालीन केंद्राकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे. 183 मृत्यूंपैकी 177 लोकांचा मृत्यू हा आरोग्याच्या समस्यांमुळे झाला आहे. यंदाच्या चारधाम यात्रेला 10 मेपासून सुरुवात केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे कपाट उघडल्यानंतर झाली होती.

जपानमध्ये धडकले शक्तिशाली शानशान वादळ

जपानमध्ये यंदाचे सर्वात शक्तिशाली वादळ शानशान धडकले. आज सकाळी 8 वाजता दक्षिण-पश्चिम क्युशू बेटावर ते धडकले. या वादळामुळे ताशी 252 कि.मी. वेगाने वारे वाहत असून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळामुळे अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. वादळाचा फटका अनेकांना बसला आहे.