अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात विरोधक सरकारला घाम फोडणार, डांबर घोटाळा आणि वरळी अपघाताचे पडसाद

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडय़ाचे कामकाज उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे. पुण्याच्या हिट अॅण्ड रन प्रकरणाची वरळीत झालेली पुनरावृत्ती, शेतकऱयांचे प्रश्न, कोटय़वधींचा डांबर घोटाळा, राज्याच्या तिजोरीतील खडखडाट आणि अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा अशा विविध मुद्दय़ांवर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत सत्ताधाऱयांकडून पुन्हा एकदा लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विधिमंमडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 27 जूनपासून सुरुवात झाली होती. तीन आठवडे चालणाऱया या अधिवेशनाच्या अखेरच्या आठवडय़ातील कामकाजाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. रविवारी वरळीत घडलेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण गाजले होते. त्यानंतर आता मुंबईतील वरळी येथील अपघातावरून विरोधक सत्ताधाऱयांना विशेष करून मिंधे गटाला लक्ष्य करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने लोकप्रिय घोषणांची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत.

अंतिम आठवडा प्रस्तावावर आक्रमक

या अधिवेशनाच्या दुसऱया आठवडय़ात विधान परिषदेतील सभागृहातील वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले होते. दुसऱया आठवडय़ातील अखेरच्या दिवशी त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला असला तरी अखेरच्या आठवडय़ात सभागृहातील त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मंत्र्याच्या सग्यासोयऱयांनी कोटय़वधींचा डांबर घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. तसेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पेंद्रातील महसूल अधिकारी सुधाकर शिंदे नऊ वर्षे पालिकेत प्रतिनियुक्तीवर कसे यावर तीव्र आक्षेप घेतला होता.