निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीचा टप्पा म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करणे. 20 नोव्हेंबरला होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. 29 ऑक्टोबरपर्यंतच अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे सर्वांचीच घाई सुरू झाली आहे. सर्वच पक्षांचे बहुतांश उमेदवार आपला अर्ज उद्या सोमवारी भरणार आहेत.
दिवाळीपूर्वीचा आजचा शेवटचा रविवार खरेदीला न जाता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामासाठी वाहिल्याचे दिसून आले. सकाळपासूनच राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती. चर्चा, बैठका रंगल्या होत्या. आघाडय़ांमधील पक्षांचे नेते गाठीभेटी आणि उमेदवार याद्यांवर विचारविमर्श करण्यात व्यस्त होते. विविध पक्षांनी आपले बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. अनेकांची तर चौथी यादी आज जाहीर झाली.
महाविकास आघाडी, महायुती, मिंधे गट, अजित पवार गटासह अन्य पक्षांचे उमेदवारही उद्याच्या तयारीत आज दंग होते. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा हा संदेश मतदारसंघातील घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला. जवळजवळ प्रत्येकाच्या मोबाईलवर उमेदवारी अर्जाबाबतची पोस्ट शेअर झाली. सोसायटय़ांमध्ये फलकही लागले होते.
कार… बाईक… ओपन ट्रक की बैलगाडी?
उद्यापासून दोन दिवस राज्याच्या कानाकोपऱयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग दिसेल. उमेदवारी अर्ज दाखल करायला जातानाही उमेदवारांकडून अनेकदा वेगवेगळय़ा वेशभूषा केल्या जातात, वाहने सजवली जातात. आजही त्याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या. कारमधून जायचे, पायी जायचे, बैलगाडीवरून जायचे, ट्रक्टरवरून जायचे की बाईक रॅली काढायची याबद्दल कार्यकर्ते आपापली मते उमेदवारांसमोर मांडत होते. कार्यकर्ते व पदाधिकारी यांची राजी, नाराजी व बंडखोरी टाळली जावी म्हणून पक्षांकडून खबरदारी घेतली जात असल्याचेही दिसून आले.
भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त
व्ही. पी. रोड पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने भुलेश्वर येथून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त केली. आयकर विभागाचा अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई व्ही.पी. रोड पोलीस करणार आहेत. वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पथकाने ही नाकाबंदी लावली होती. नाकाबंदीदरम्यान तीन जण मोटरसायकलवरून, तर दोघे पायी जात होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्या पाच जणांना थांबवले. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात 1 कोटी 32 लाख सापडले.