![loksabha election (4)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/04/loksabha-election-4-696x447.jpg)
संपूर्ण हिंदुस्थानचे भवितव्य ठरवणाऱया सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम सातव्या टप्प्यातील प्रचार आज समाप्त झाला. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी सातव्या टप्प्यातील मतदान शनिवारी होणार असून या वेळी पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
उत्तर प्रदेशच्या 13 जागा, पंजाबच्या सर्व 13 जागा, पश्चिम बंगालच्या 9 जागा, बिहारच्या 8 जागा, ओडिशा 6, हिमाचल प्रदेशच्या 4 जागा, झारखंड 3 आणि चंदीगडची 1 अशा 57 जागांसाठी उद्या मतदान होत आहे. एकूण 904 उमेदवार या टप्प्यात रिंगणात आहेत. ओदिशातील विधानसभेच्या 42 जागांवरही उद्या मतदान होईल. आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सहाव्या टप्प्यात 63.93 टक्के मतदान झाले होते. या अंतिम टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची सर्वच पक्षांची अपेक्षा आहे.
वाराणसीकडे लक्ष
शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात मतदान आहे. मोदींच्या विरोधात येथे काँग्रेसचे उमेदवार आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय उभे आहेत. याशिवाय रवी किशन, अनुराग ठाकूर, विक्रमादित्य सिंह, अभिषेक बॅनर्जी, मिसा भारती यांच्या लढतींकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, निकाल 4 जून रोजी जाहीर होणार असले तरी तत्पूर्वी मतदारांचा कल आणि काwल काय असेल याचा अंदाज सांगणारे एक्झिट पोल शनिवारी संध्याकाळपासूनच वृत्तवाहिन्यांवर सुरू होतील.