या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कधी आहे? जाणून घ्या महत्त्व…

>> योगेश जोशी

आपल्या संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांना अनन्यासाधारण महत्त्व आहे. या योगावर एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे शुभ मानले जाते. या साडेतीन मुहूर्तांवर तिथी, वार, नक्षत्र बघण्याची गरज नसते. त्यामुळे या मुहूर्तावर अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यात येते. तसेच अनेकजण या मुहूर्तांवर सोने, चांदी, अलंकार, वाहन किंवा गृह खरेदीला प्राधान्य देतात. या साडेतीन मुहूर्तांव्यतिरिक्त इतर आणखी काही योगही शुभ मानले जातात. त्यात गुरुपुष्यामृत आणि रविपुष्यामृत योग शुभ मानले जातात. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ…

गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास गुरुपुष्यामृत योग तयार होतो. तर रविवारी पुष्य नक्षत्र आल्यास रविपुष्य योग तयार होतो. हे दोन योगही शुभ मानले जातात. अनेकजण गुरुपुष्ययोगावरही सोने, चांदी आणि अलंकार खरेदी करतात. वर्षभरात साधारण तीन-चार वेळा गुरुपुष्य आणि रविपुष्य योग येतात. या वर्षातील शेवटचा गुरुपुष्ययोग 21 नोव्हेंबरला होत आहे.

गुरुवारी सूर्योदयापासून दुपारी 3.34 वाजेपर्यंत हा योग आहे. या योगात अनेक सुभ गोष्टींची सुरुवात करता येणार आहे. तसेच सोने, चांदी, अलंकार खरेदी करण्यासाठीही हा दिवस शुभ आहे. पुष्य नक्षत्र बुधवारी दुपारी 2.49 वाजता सुरू झाला आहे. तर गुरुवारी दुपारपर्यंत 3.34 वाजेपर्यंत हे नक्षत्र असल्याने सूर्योदयापासून दुपारी 3.34 वाजेपर्यंत हा योग असणार आहे.

गुरुवार हा शुभ मानला जातो. तसेच पुष्य हे शनीचे नक्षत्र आहे. तसेच ज्योतिषशास्त्राप्रमाणे शनि आणि गुरु यांचा सर्वाधिक प्रभाव असतो. अनेकजण शनीला पीडाकारक मानतात. मात्र, शनी पीडाकारक नसून तो न्यायाधीश आहे. मनुष्यांच्या चांगल्या- वाईट कर्माचे फळ देण्याचे काम त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ज्ञान देणारा गुरु ग्रह आणि विरक्ती आणि भक्तीमार्गाकडे वळवणारा शनी यांच्या संयोगाने तयार होणारा योग शुभ मानला जातो. तसेच या योगावर खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत वाढत जाते. त्यात नेहमी वृद्धी होते. तसेच नवीन सुरू केलेल्या गोष्टींमध्येही प्रगती होते. त्यामुळे या योगाला महत्त्व प्राप्त झाले आहे.