
लश्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला मोठा धक्का बसला आहे. हाफिजचा नातेवाईक व लश्कर ए तोयबाचा फायनॅन्सर असलेल्या कारी अब्दू रेहमान याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कराची येथे रेहमानच्या दुकानात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गेल्या आठवड्यातही हाफिज सईदचा सहकारी व जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार अबू कताल ऊर्फ कताल सिंघी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. झेलम परिसरात कताल आपल्या सुरक्षा रक्षकासोबत प्रवास करत होता तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी हाफिज सईद देखील त्याच्याबरोबर होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर हाफिज सईदने तिथून पळ काढला होता.