जालन्यातील सातेफळच्या शाळेत पोषण आहारातील भाजीपाल्यात अळ्या; ग्रामस्थ आक्रमक

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांच्या आहारात वापरण्यात येत असलेला भाजीपाला सडलेला असून त्यात अळ्या असल्याचे पालक व शाळा समितीचे सदस्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शाळेवर जिल्हा परिषद कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शाळा सुरू झाल्यापासून एकही दिवस मेनूनुसार पोषण आहार दिलेला नाही. गॅस जास्त खर्च होतो म्हणून भाजी, आमटी किंवा उसळ पूर्णपणे व्यवस्थित शिजवली जात नाही. शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत फक्त एकदाच पूरक आहार दिला गेला आहे. तेही फक्त तीन बिस्किट वाटप केले. वाटाणे देखील कमी शिजवता कच्चे दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये पोटदुखीचे प्रमाण वाढले आहे. पोषण आहारात भाजीपाला निकृष्ट असतो तसेच पदार्थ देण्याचे प्रमाणही अतिशय कमी असते. पोषण आहार व्यवस्थित साठवलेला नाही. त्यामुळे त्यात अळ्या किडे होत आहेत, अशा तक्रारी करण्यात येत आहेत.

शाळेतील शालेय पोषण आहारात शासनाकडून प्रती विद्यार्थी मिळणारे दर पहिली ते पाचवी २.०८ रुपये, सहावी ते आठवीवी, ३.११ रुपये याप्रमाणे शाळेस दररोज 450 ते 500 रुपये येतात. मात्र काही शाळा 50 ते 100 रुपयेच खर्च करतात. मागील दिवसापूर्वी शाळेचे पोषण आहाराचे तांदूळ परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात मुख्यध्यापकांची बदली करण्यात आली होती. तर काहीच महिन्यात पुन्हा त्यांची बदली त्याच शाळेवर करण्यात आली आहे. आता पोषण आहारतील भाजीपाल्यात अळ्या आढळल्याने मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रा.पं.सदस्य प्रभू बनकर, ज्ञानेश्वर बनकर, विष्णू बनकर, समिती अध्यक्ष मारुती बनकर, उपाध्यक्ष सुभाष बनकर, दत्तू बनकर यांच्यासह पालकांनी केली आहे.