Dapoli News – दापोली तालुक्यात वृक्ष तोडीचा हैदोस; गांधारीची पट्टी बांधलेल्या वन विभागाच्या आशिर्वादाने वन संपत्तीचा नाश

एकीकडे “झाडे लावा झाडे जगवा”चा शासनाकडून संदेश दिला जातोय, तर दुसरीकडे मात्र दापोलीत गांधारीची डोळयावर पट्टी बांधलेल्या वन विभागाच्या आशिर्वादानेच राजरोसपणे झाडांची कत्तल केली जात आहे. निसर्ग संपन्नतेने नटलेल्या दापोली तालुक्यात वृक्ष तोडीचा अक्षरश: हैदोस सुरू आहे. अगदी राजरोसपणे झाडांची कत्तल होत आहे. असे असतानाही वन विभाग मात्र बघ्याची भूमिका निभावताना दिसत आहे. त्यामुळे वन विभागातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने वन संपत्तीचा नाश होत असल्याला चर्चा रंगताना दिसत आहे.

दापोली तालुक्यात बेसुमार वृक्ष तोड होत असताना लाकुड माफिया, हे वन विभाग आपल्या खिशात असल्याचे भासवत व्यापारी आणि दलाल यांच्या संगनमताने वृक्ष तोड करत आहेत. वृक्ष तोडीचा येथील पर्जन्यमानावर तर परिणाम होतोच आहे, शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास होत वातावरणाचा समतोल बिघडत आहे. वृक्ष तोडीच्या प्रकाराबाबत मात्र तालुक्यातील वन विभाग अधिकारी हे डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधून भुमिका निभावताना दिसत आहेत. या सर्व प्रकाराला वन परिक्षेत्र मंडळ दापोलीचे कार्यालय जबाबदार असल्याची जनतेची भावना आहे. वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आधार तालूका वन कार्यालय घेत असल्याने आर्थिक मांडवळीचा खेळ राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे दापोली तालुक्यातील वनसंपदा आर्थिक मांडवळीतूनच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा शासनाचा संदेश अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पायदळी तुडवला गेला आहे. त्यामुळे अंमलबजावणीचे सोडा पण आहे त्या वनसंपदेचे भविष्यात वन विभागाकडून रक्षण केले जाईल का? असा सवाल येथील सजग नागरिकांकडून विचारला जात आहे.