पाकिस्तानच्या समुद्रात मोठा तेल, नैसर्गिक वायूसाठा; जगातील चौथ्या क्रमांकाचा साठा असल्याचा दावा

पाकिस्तानच्या सागरी हद्दीत खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडल्याचे वृत्त असून हा साठा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा साठा असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

सध्या खिळखिळ्या अवस्थेत असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे गाडे सुरळीत आणि सुदृढ करण्याची क्षमता या साठय़ामध्ये आहे, असे वृत्त डॉन न्यूज टीव्ही वाहिनीने दिले आहे. एका मित्रराष्ट्राच्या सहकार्याने तीन वर्षे केलेल्या सर्वेक्षणानंतर या साठय़ाच्या अस्तित्वाची खातरजमा करण्यात आली, असे एका अधिकाऱयाने म्हटले आहे.

सर्वेक्षणानंतर या साठय़ांचा ठावठिकाणा निश्चित करून संबंधित खात्यांकडून सरकारला तशी माहिती देण्यात आली आहे. नजीकच्या काळात हे तेल आणि वायू बाहेर आणण्यासाठी काम सुरू होऊ शकते, असे या अधिकाऱयाने सांगितले. दरम्यान, खनिज तेलसाठय़ाच्या बाबतीत व्हेनेझुएलानंतर सौदी अरेबिया, इराण, पॅनडा आणि इराक अशी क्रमवारी लागते. नॉर्वेच्या समुद्रातही मोठय़ा प्रमाणावर तेलसाठे आढळून आले आहेत.