वणी तालुक्यात मंदर गावाजवळ सापडले सातवाहन काळातील मोठे शहर; संशोधनाची गरज व्यक्त

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात धंदर हे गाव 1800 वर्षांपूर्वी सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यातील मोठे शहर असल्याचे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. येथे सापडलेली नाणी आणि वस्तू त्याच काळातील असल्याचा दावा प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. पुरातत्व विभाग किंवा विद्यापीठाने सविस्तर संशोधन आणि उत्खनन केल्यास पुन्हा अनेक पुरावे संशोधनासाठी सापडतील, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. प्रा. सुरेश चोपणे या ठिकाणी पुरावे गोळा करीत होते. त्यांना संशोधनादरम्यान एका शेतकऱ्याकडून पुरातन नाणे सापडल्याने त्यांना या गावाचा नेमका काळसमजला आहे.

आपला देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास 2500 वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात 70,000 वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व आणि इतिहास आहे. देशाचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली आहे. सातवाहन इ.स.पू. 230 या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य असलेले पशुपालक राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशात पसरले होते. सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता, असेही मानले जाते. पैठण, जुन्नर, तेर , नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली व्यापारी शहरे या राजवटीत उदयास आली. राजा सिमुक सातवाहन हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो.

धन्दर हे सुमारे 2 किमी परिसरात वसलेले गाव होते. या गावामध्ये श्रीमंत लोकांची विटांची घरे तर सभोवताली मातीची लहान घरे होती. गावाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून पूर्वेला आणि उत्तरेला दोन मोठे तलाव बांधले होते. ते आजही शाबूत आहेत. तलावाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी दगडाचे चौरस उघडे पंचायत सभागृह दिसते. तसेच मृतांना दफन केलेली स्थळेही दिसतात. मोठमोठे रांजण, मटके, दिवे परिसरात विखुरलेली आहेत. काही विटा, काळ्या खडकाची पाटे-वरवंटेही दिसतात. अनेक काळ्या दगडांपासून बनविलेल्या गृह उपयोगी वस्तू, अनेक मुर्त्या, जनावरांची हाडेही सापडली आहेत. येथील शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना क्वचित सोने चांदीचे अलंकार, नाणी मिळाली असून बहुतेकांनी ती दडवून ठेवल्याने या इतिहासाबाबतची सविस्तर माहिती मिळत नाही. येथील स्त्री-पुरुषांचा पेहरावा राजस्थानी पेहरावासारखा लेहंगा, चोळी असल्याचे तसेच अलंकार म्हणून मोठ्या बांगड्‌या आणि मातीचे मणी घालत असल्याचे मिळालेल्या मुर्त्यांवरून समजते. येथे सापडलेल्या पुराव्यानुसार येथील रहिवासी घरी गायी बैल पाळत असून आणि दूध, दही मोठ्या प्रमाणावर वापरत असत. येथील वस्ती खूप प्रगत नसली तरी त्या काळानुसार प्रगत आणि व्यवस्थित वसवली होती.

या स्थळाचे उत्खनन झाल्यास अनेक वस्तू, नाणी, अलंकार आणि पुरावे आढळू शकतात. हे गाव 1800 वर्षे जुने असले तरी नंतरच्या राज्यातही टिकून राहिले असेल. नंतर इतर राज्यांच्या आक्रमणात हे गाव नष्ट झाले असावे, त्यामुळे आज तेथे काही पुरातन अवशेष दिसून येतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्थानिकांनी कालांतराने येथून जवळच मंदर येथे नवे गाव वसवल्याची शक्यता आहे. येथून गेलेला राज्यमार्ग हा ह्या प्राचीन गावातून गेलेला आहे, त्यामुळे अनेक पुरावे सुद्धा नष्ट झाले आहेत. हे गाव प्राचीन असले तरी तिथे मध्ययुगीन काळातील पुरावे आढळू शकतात. शासनाच्या पुरातत्व विभागाने किंवा नागपूर विद्यापीठाने इथे उत्खनन करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे. ते याबाबतच्या संशोधनाचा अहवाल पुरातत्व विभागाला आणि विद्यापीठाला पाठविणार आहेत.