वायनाडमध्ये चिखलाच्या ढिगांखालून दीड हजार जणांची सुटका, केरळच्या 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून काळाचा घाला पडलेल्या वायनाडमध्ये दाखल झालेल्या लष्कराच्या पथकांमुळे बचाव आणि मदतकार्याला वेग आला असला तरी अद्यापही अनेकजण चिखलमातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले आहेत. मंगळवारी पहाटे झालेल्या भूस्खलनानंतर चिखलमातीच्या राडय़ाखाली नाहीशा झालेल्या चार गावांमधील मृतांची संख्या आता 165 वर पोहोचली आहे. वायनाडसह 8 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे.

केरळ राज्याची बचाव पथके, एनडीआरएफ, नौदल आणि लष्कराच्या जवानांनी ठिकठिकाणी चिखल, दलदलीत उतरून भरपावसात मदत आणि बचावकार्य सुरू ठेवले आहे. अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना बचाव पथकांनी दोरखंड लावून, तात्पुरते पूल उभारून, मानवी साखळी करून सुरक्षित स्थळी हलवले आहे. गावांत साचलेले चिखल आणि दलदलीचे ढीग उकरून बचावकर्त्यांनी अनेक मृतदेह बाहेर काढले असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये 18 लहान मुलांचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने बुधवारी सांगितले.

राहुल, प्रियंका गांधी आज वायनाडमध्ये

सततच्या पावसामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपला वायनाड दौरा बुधवारी रद्द केला होता. आता उद्या गुरुवारी ते वायनाड येथे जाणार असून तेथील आपत्तीग्रस्त कुटुंबांची भेट घेणार आहेत.

केंद्राकडून भरपाई जाहीर

आज संसदेत पुन्हा वायनाडच्या भूस्खलनावर चर्चा झाली. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्राने वायनाडसाठी सर्वतोपरी मदत तातडीने द्यावी, अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली.

वेदनादायक विनाश

केरळने यापूर्वी कधीही अशी वेदनादायक दृश्ये अनुभवली नाहीत, असे सांगत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मदत आणि बचावकार्याची माहिती दिली. मुंडक्काई आणि चूरलमला भागातील दृश्ये विनाशकारी आहेत. हे दोन्ही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, असे ते म्हणाले. दोन दिवसांच्या बचाव मोहिमेत 1,592 लोकांना वाचवण्यात आले आहे. जिह्यात सध्या 82 मदत शिबिरांमध्ये 8,017 लोक आहेत. यामध्ये 19 गर्भवती महिलांचा समावेश आहे.

बचाव पथकांचे अहोरात्र मदतकार्य

काही गावांत अडकलेल्या लोकांना दोरखंडांच्या सहाय्याने कंरभर पाण्यातून बाहेर काढण्यात आले. काही भागांत बचाव पथकांनी मृतदेहही बाहेर काढून केबलच्या सहाय्याने नदीपलीकडे नेले. जिथे जिथे ढिगाऱ्यांखाली कुणी अडकल्याची शक्यता आहे तिथे बचाव पथके हा चिखल, दगडमाती हटवून शोध घेत आहेत. बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत अशा प्रकारे सुमारे दीड हजार जणांची सुटका केली होती. दलदलीने वेढलेल्या आपत्तीग्रस्त भागातून 213 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी 97 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.  निसर्गाच्या या प्रकोपात जवळपास नष्टच झालेल्या मुंडक्काई, चुरामाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावातील 220 हून अधिक लोक आजही बेपत्ता आहेत.