वायनाडवर आभाळ कोसळले; चार गावे वाहून गेली; 123 जणांचा मृत्यू; 400 हून अधिक बेपत्ता

केरळातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वायनाडवर मंगळवारी पहाटे अक्षरशः आभाळ कोसळले. मुसळधार पावसाचा तडाखा झेलणाऱ्या वायनाडमध्ये तीन तासांत चार भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मातीच्या महापुरात चार गावे वाहून गेली. या गावांचे नामोनिशाणच शिल्लक राहिले नाही. घर, पूल, रस्ते, वाहने… काहीच वाचले नाही. सगळे काही वाहून गेले. भूस्खलनात 123 जणांचा मृत्यू झाला असून 400पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफसोबतच मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. आतापर्यंत शेकडो जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही ढिगाऱ्याखालून ‘वाचवा… वाचवा…’ अशा मदतीसाठी पह्डलेल्या किंकाळय़ा ऐकू येत आहेत. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मुंडक्काई गावच बेपत्ता!

रात्रीच्या अंधारात डोंगरातून अचानक मातीचा महाकाय ढिगारा आला आणि मुंडक्काई गावच त्यात बेपत्ता झाले. गावाकडे जाणारे सर्व रस्ते दलदलीने भरून गेले. सगळीकडे पुरुषभर उंचीचा चिखल झाला. मदतीसाठी लष्कराचे पथक आले… पण त्यांना गावच दिसत नव्हते. काही लोक मदतीसाठी याचना करत होते. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीही जवानांना महप्रयास करावा लागला. सायंकाळपर्यंत या ठिकाणी मदतही पोहचू शकली नाही.

राहुल गांधी यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते व वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी भूस्खलनाच्या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. जे लोक अजूनही ढिगाऱ्याखाली फसले आहेत, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री विजयन यांच्याशी चर्चा केल्याचेही ते म्हणाले.

116 जखमी रुग्णालयांत

निसर्गाच्या या उद्रेकात आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. 116 जण रुग्णालयात आहेत, तर 400हून अधिक लोक बेपत्ता आहेत. सोमवारपासून या परिसराला पावसाने झोडपले होते. अतोनात पावसामुळे डोंगरांच्या उतारांवरील माती, दगड, झाडे सैल होऊन दगडमाती, चिखलाचे लोंढेच उतारावरील गावांकडे धाव घेऊ लागले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला आणि रात्री उशिरा 2 वाजता डोंगराला लागून असलेल्या गावांना या कोसळणाऱ्या दरडी आणि चिखलाच्या ढिगांनी झाकून टाकले.

बचावकार्यात लष्कराचे सहकार्य

एसआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी या दुर्घटनेची खबर मिळताच घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. याशिवाय कन्नूरमधील 225 लष्करी जवानांना वायनाडला पाठवण्यात आले आहे. बचावकार्यासाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरही पाठवण्यात आली होती, मात्र पावसामुळे त्यांना कोझिकोडला परतावे लागले. मद्रास रेजिमेंटचे एक पथक, नौदल अकादमीतील काही प्रशिक्षणार्थी नौसैनिकही मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत.

गावांत विदारक परिस्थिती

डोंगराच्या दोन्ही बाजूंनी आलेल्या पाणी आणि चिखलमातीच्या लोटांबरोबर गावातील बहुतेक सर्व घरे, रस्ते, वाहने सारे काही वाहून गेले. सर्वत्र पाणी, चिखल आणि कचरा दिसत होता. कोसळणाऱ्या दरडींबरोबर डोंगर उतारांवरील मोठमोठे दगडही गावात आले. अनेक ठिकाणी परिसराला नदीपात्राचेच स्वरूप प्राप्त झाले होते. उद्ध्वस्त घरे आणि ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी केलेले फोन आणि चॅनेलवर दिसणारी दृश्ये पाहून येथील विदारक परिस्थिती जाणवत होती.