वायनाडमध्ये भूस्खलनामुळे तब्बल 200 लोकांना जीव गमवावा लागला. मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी होऊनही केंद्र सरकारने मात्र त्यांच्यासाठी अत्यंत तोकडी आर्थिक मदत दिली. केंद्राने कुठल्याही प्रकारचे ठोस सहकार्य केले नाही, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी केला आहे. राज्याच्या 68व्या स्थापना दिवसानिमित्त ते बोलत होते.
केरळमध्ये विकासासाठी पेंद्र सरकारने ठोस अशी आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे विकासात अनेक अडथळे आले, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल 90 दिवस उलटले. परंतु अजूनही पेंद्र सरकार वायनाडकडे कानाडोळा करत आहे. केंद्राचे असे वागणे अत्यंत क्रूरपणाचे आहे. येथील आपत्तीग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही केंद्राने कुठल्याही प्रकारची पावले उचलली नाहीत, असा आरोपही पिनरई यांनी केला. इतर राज्यांमध्ये जेव्हा अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती ओढवते तेव्हा केंद्राकडून तातडीने पावले उचलली जातात. परंतु केरळमध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती ओढवते तेव्हा केंद्राकडून कोणतेही आर्थिक किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.