भाडेकरारनाम्याचे बनावट कागदपत्रे रंगवून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुतण्याने भिवंडीत जमीन व गाळा बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईतील व्यावसायिक अक्षय जैन (वय – 63) यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी पुतण्या सुमित पाटील आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. कपिल पाटील केंद्रात पंचायतराज मंत्री असताना 2023 मध्ये सुमित पाटील याने ही हेराफेरी केली होती.
मुंबईत राहणारे व्यावसायिक अक्षय जैन यांची धामणकर नाका येथे जमीन असून तेथे त्यांनी गाळे बांधले आहेत. या जागेवर रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी कपिल पाटील यांचा पुतण्या सुमित पाटील याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने बनावट भाडेकरारनामा तयार केला व त्या आधारे हॉटेलसाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या मिळवल्या. त्यानंतर सत्तेच्या जीवावर ही जागा व गाळे बळकावले.
सुरेंद्र पाटील व देवेंद्र पाटील यांना साक्षीदार ठेवून नोटरी केली गेली. त्यानंतर बळकावलेल्या मालमत्तेच्या पत्त्यावर जीएसटी परवाना, फूड लायसन्स, अग्निशमन, परवाना तयार केला. याचा भंडाफोड होताच अक्षय आहे. जैन यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुमित पाटील, सुरेंद्र पाटील व देवेंद्र पाटील या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अडचणीत वाढ
लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी कपिल पाटील यांनी पोलिसांना शिवीगाळ केली होती. आता पुतण्या सुमित पाटील याचा नवा कारनामा समोर आला विशेष म्हणजे हा सर्व प्रकार कपिल पाटील मंत्री असताना झाल्याने सत्तेचा गैरवापर करून हा सर्व व्यवहार केला होता का, असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.