समुद्र कोकणात, फिशरीज कॉलेजला जागा मात्र अमरावतीत, मिंध्यांचा अजब कारभार

कोकणाला साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलाय, पण मिंधे सरकारने मात्र नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी अमरावतीमध्ये जागा मंजूर केली. मिंधे सरकारच्या या अजब कारभाराचे सर्वत्र हसे होत असून अमरावतीत नेमके कुणाच्या फायद्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असा सवाल उपस्थित होत आहे.

अमरावती जिह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी मोर्शी शहरातील जलसंपदा वसाहतीतील 0.61 हेक्टर आर तसेच 4.08 हेक्टर आर जागा तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी राष्ट्रीय मत्स्य बीज केंद्र सिंभोरा यांची 33 हेक्टर एवढी जमीन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना देण्यात येणार आहे.

या महाविद्यालयातील पदांसाठी 31 कोटी 48 लाख रुपये खर्च येणार आहे. त्याशिवाय बांधकाम, फर्निचर वाहन खरेदी यासाठी 171 कोटी 6 लाख खर्च येणार आहे. यापूर्वी मोर्शी तालुक्यातील पार्डी येथे हे मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली होती, मात्र ती जागा उपयुक्त नसल्याने मोर्शी शहरातील उर्ध्व वर्धा जलसंपदा वसाहतीतील जागा निश्चित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.