Euro Cup 2024: यमालची धमाल; एक तपानंतर स्पेनची फायनलमध्ये धडक

16 वर्षीय लमीन यमालने धमाल केली. डीच्या बाहेर असलेल्या चेंडूवर हल्ला चढवत केलेल्या अफलातून गोलने स्पेनला अंतिम फेरीत धडक मारून दिली. या गोलच्या जोरावर तब्बल एका तपानंतर म्हणजेच 12 वर्षांनंतर स्पेनने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. म्युनिकच्या म्युनिक फुटबॉल अरिनावर झालेल्या उपांत्य लढतीन स्पेनने फ्रान्सचा 2-1 गोल फरकाने पराभव करताना सलग सहाव्या विजयाची नोंद केली. चार मिनिटांत केलेले दोन गोल स्पेनला अंतिम फेरीत पोहोचविण्यासाठी पुरेसे ठरले. याआधी, 2012 मध्ये स्पेनने या इटलीला हरवून या स्पर्धेची फायनल गाठली होती.

16 वर्षांचा लमीन यमाल व दानी ओल्मो स्पेनच्या विजयाचे हीरो ठरले. यमाल हा युरो कपच्या इतिहासातील सर्वात कमी वयात गोल करणारा खेळाडू ठरला आहे. दोघांनी आपल्या संघासाठी प्रत्येकी एक गोल केला. या लढतीची सुरुवातच आक्रमक झाली. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पेने सातव्या मिनिटालाच स्पेनच्या गोलपोस्टवर धडक दिली होती. मात्र, स्पेनच्या जीसस नवासने हा गोल होऊ दिला नाही. मात्र, त्यानंतर दोनच मिनिटांनी एम्बाप्पेच्या वेगवान पासवर कोलो मुआनीने सुरेख गोल करीत फ्रान्सचे खाते उघडले.

विजयी षटकार
स्पेनने आज फ्रान्सला हरवत युरो कपमध्ये सलग सहाव्या विजयाची नोंद केली. युरो कपच्या इतिहासात एका स्पर्धेत सलग सहा विजय मिळवणारा स्पेन पहिलाच संघ ठरला आहे. आता तो आपल्या चौथ्या विजेतेपदापासून केवळ एक विजय दूर आहे. स्पेनने साखळी सामन्यात क्रोएशिया, इटली आणि अल्बानिया या संघाचा पराभव करताना प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिला नाही. तसेच नंतर जॉर्जियाचा 4-1 ने धुव्वा उडवला. यजमान जर्मनीचा 2-1 पराभव करत उपांत्य फेरी गाठली आणि त्याच जोशात फ्रान्सचा पाडाव करत आपल्या चौथ्या जेतेपदाच्या दिशेने मार्गक्रमण केले.

चार मिनिटांत दोन गोल
फ्रान्सने पहिला गोल करून आघाडी मिळविली असली तरी त्यांचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण 21 व्या मिनिटाला 16 वर्षीय लमीन यमालने गोल करीत स्पेनला 1-1 अशा बरोबरीत आणले. त्यानंतर चारच मिनिटांनी म्हणजे 25व्या मिनिटाला दानी ओल्मोने गोल करीत स्पेनला 2-1 असे आघाडीवर नेले. स्पेनने गेल्या पाच सामन्यांत केवळ एक गोल खाणाऱया फ्रान्सविरुद्ध चार मिनिटांत दोन गोल करण्याचा करिश्मा केला. मध्यंतरानंतर फ्रान्सचे लढतीत पुनरागमन करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसले, मात्र स्पेनच्या खेळाडूंनी फ्रान्सच्या संरक्षण फळीवर वर्चस्व गाजविण्यात यश मिळविले. तरीही 60 व्या मिनिटाला ओस्मान डेम्बेल याने क्रॉस शॉटवर फ्रान्ससाठी बरोबरीचा गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमनने हा गोल अडवून फ्रान्सचे मनसुबे उधळून लावले. स्पेनने ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. आता रविवारी इंग्लंड व नेदरलॅण्ड्स यांच्यातील दुसऱया उपांत्य लढतीतील विजयी संघाशी स्पेनची जेतेपदाच्या लढतीत गाठ पडेल.