मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनीने अचानक पेट घेतल्याने ‘द बर्निंग कार’ चा थरार पाहायला मिळाला. बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली. सुमारे ४५ मिनिटांत आग आटोक्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
दिल्लीत थंडीमुळे रेल्वे सेवा गारठली
देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. धुक्यामुळे दिल्लीच्या दिशेने जाणार्या अनेक रेल्वे गाडया उशीराने पोहोचत आहेत. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २० हून अधिक रेल्वे गाड्या ७ तास उशीराने धावत आहेत.
बांगलादेशच्या सचिवालयात आग
बांगलादेशची राजधानी ढाका येथील सचिवालयाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. सचिवालय इमारतीच्या ७ क्रमांकाच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग लागली. या इमारतीत विविध मंत्रालये असल्याने महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. आग आटोक्यात आणत असताना टँकरच्या धडकेत अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला.