पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची मनीषा बोलून दाखवली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ममता बॅनर्जींमध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी देखील ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवला आहे. ”ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करायला हवे”, अशी प्रतिक्रीया लालू प्रसाद यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
”काँग्रेसने ममता बॅनर्जींचा विरोध करण्याचा काही अर्थ नाही. त्यांच्या विरोधाने काही होणार नाही. ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचे प्रमुख बनवायला हवे”, असे लालू प्रसाद यादव म्हणाले.
मला संधी मिळाल्यास मी ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन. बंगालच्या बाहेर जाण्याची आपली इच्छा नाही, पण मी इथून ‘इंडिया’ आघाडी चालवू शकते, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली इच्छा व्यक्त केली.
मी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱयांवर ती चालवण्याची जबाबदारी आहे. ते जर हे व्यवस्थित करत नसतील तर त्याला मी काय करू शकते? मी फक्त इतकेच म्हणेन की, सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आनंदच होईल – सुप्रिया सुळे
ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचा अविभाज्य भाग आहेत. लोकशाहीत विरोधी पक्षाची मोठी भूमिका आणि जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना आणखी काही जबाबदारी घ्यायची असेल तर आम्हाला खूप आनंद होईल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.