लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल

राष्ट्रीय जनता दल (राजद) सुप्रिमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मंगळवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे.

Lalu Prasad Yadav यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली आहे.

राजदचे युवा कार्यकर्ते प्रिन्स यादव यांनी लालू प्रसाद यादव यांचे रुग्णालयातील फोटो शेअर केले आहेत. “गरिबांचे तारणहार आणि राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिहारमधील सर्व जनता लालुजी लवकर बरे व्हावोत अशी प्रार्थना करत आहे”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून लालू प्रसाद यादव वेगवेगळ्या व्यधींनी ग्रस्त आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वाढत्या वयामुळेही त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते राजकारणामध्येही जास्त सक्रिय नाहीत.