
‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवासोबतच वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. येत्या रविवार, 6 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मंडळातर्फे गणेशगल्ली येथील महाराष्ट्र सेवा मंडळ येथे ‘चला आरोग्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात किडनीची काळजी कशी घ्यावी व त्याचे उपचार कसे करावेत, उच्च रक्तदाब कशामुळे होतो, त्यावर नियंत्रण कसे ठेवावे, आपले शारीरिक आरोग्य निरोगी कसे ठेवावे या आणि अशा अनेक समस्यांवर तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टीम मार्गदर्शन करणार आहे. या शिबिरासाठी ग्लेनईगल हॉस्पिटल आणि नर्मदा किडनी फाऊंडेशनचे सहकार्य मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी केले.