वांद्रे पश्चिम लकी हॉटेल येथे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास 600 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील रहिवाशांना आज अपुऱया पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागला. स्वामी विवेकानंद रोडवर जंक्शनजवळ ही पाइपलाइन फुटली. त्यामुळे वांद्रे पश्चिम परिसरात पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल विभागाकडून हाती घेण्यात आले असून उद्या सकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जल विभागाकडून देण्यात आली. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वेरावली जलाशयातून आवश्यक पाणी घेऊन पुरवठा सुरळीत ठेवण्यात आल्याचे जल विभागाने स्पष्ट केले.