उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच शिरूर तालुक्यातील तलावांनी गाठला तळ

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यातील तलावांनी तळ गाठला आहे. मोटेवाडी तलाव आठ दिवसांपूर्वी कोरडा पडला आहे. चासकमान कालव्याच्या पाण्याने हे तलाव भरण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

डिसेंबर महिन्यात सोडलेल्या आवर्तनातील चासकमान धरणाचे पाणी तब्बल 50 दिवसांनंतरही टेलला पोहचले नाही. पाण्याअभावी या भागातील शेतकरी आपला नऊ, दहा महिन्यांचा ऊस मिळेल त्या भावाने तोडणीला देत आहेत. तर, एक दीड महिन्याचे कांदापीक शेवटची घटका मोजत आहे. पिके जगविण्यासाठी परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. शिरूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पूर्व भागातील गुनाट, निमोणे, कर्डे, आंबळे, न्हावरे, निर्वी, कोळगाव, आलेगाव, उरळगाव, आंधळगाव, शिरसगाव या गावांमध्ये विहिरी तसेच विंधन विहिरींची जलपातळी खालावली आहे. तर, अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. चासकमान धरणाच्या पाण्यातून भरल्या जाणाऱ्या तलांवापैकी कोळगाव डोळस, आंधळगाव, गुनाट, निमोणे येथील तलावांच्या पाण्याने तळ गाठला आहे. तर, मोटेवाडी तलाव आठ दिवसांपूर्वी कोरडा पडला आहे. या तलावांवर पूर्व भागातील शेकडो एकर शेती अवलंबून आहे. परंतु पाण्याच्या नियोजनाअभावी हे तलाव कोरडे पडले आहेत. विहिरी आणि विंधन विहीरींची पाणीपातळी खालावली आहे. गेल्या वर्षी या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने डिसेंबर महिन्यात चासकमानचे आवर्तन सोडण्यात आले होते. यंदाही वेळेवर पाणी उपलब्ध होईल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे.

चासकमानच्या पाण्याची मागणी

■ चासकमानच्या कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी लवकरात लवकर सोडावे. हे पाणी शेवटच्या भागात पोहचवावे व आवर्तन बंद करण्यापूर्वी या भागातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.