‘लग्नाची बेडी’ 7 जुलैला नव्या संचात रसिकांच्या भेटीला; अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात प्रयोगाचे आयोजन

धमाल मस्ती दोन अंकी नाटक ‘लग्नाची बेडी’ रविवार, 7 जुलैला रसिकांच्या भेटीला येत आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील खालचे अणसूर या गावातील कलाकारांनी ‘लग्नाची बेडी’ नाटकात भूमिका केल्या आहेत. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान वनस्पती व प्राणिसंग्रहालयातील अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात आचार्य अत्रे लिखित आणि जगदीश गावडे दिग्दर्शित ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकात कलाकारांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनावर छाप उमटवतील, असा विश्वास जगदीश गावडे यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कलाप्रवासाचा वारसा
साधारणतः 1932 साली जेव्हा देश पारतंत्र्यात होता आणि साधी विजेची व्यवस्थाही गावी नव्हती तेव्हा या नाटकाची सुरुवात गावच्या काही कलाप्रेमी लोकांनी केली आणि गावच्या कला प्रवासाला सुरुवात झाली. तोच हा कलाप्रवास आजपर्यंत चिरंतन आणी अविरत सुरू आहे. 1932 साली साध्या दगड-मातीच्या रंगमंचावरून आणि पंदिलाच्या प्रकाशात हा कलेचा प्रवास सुरू झाला. तोच कलेचा प्रवास अविरत चालू ठेवण्यासाठी श्री देव दाडोबा रंगमंचाचे काम हाती घेण्यात आले आहे. श्री देव दाडोबा प्रासादिक नाटय़ मंडळाच्या वतीने श्री देव दाडोबा रंगमंच निर्माण निधीसंकलनासाठी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. संपर्क – महेश गावडे 9637082081.

कलाप्रेमी गाव खालचे अणसूर

खालचे अणसूर हे सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत लपलेले जेमतेम 40 ते 45 घरांचे एक छोटेसे गाव. ग्रामदैवत श्री देव दाडोबा ही या गावची प्रमुख ओळख. पण या गावाला एक कलेचा संपन्न वारसा लाभलेला आहे. भजन आणि नाटय़कलेत या गावची ओळख संपूर्ण जिह्यात आहे. संगीत विशारद, पखवाज वादन, दशावतार ते अगदी टीव्ही मालिकांपर्यंत इथले कलाकार हे लीलया वावरताना दिसतात. या गावचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे शिमगोत्सवात चव्हाटा मंदिर येथे दरवर्षी सादर होणारे स्थानिक कलाकारांचे नाटक. दरवर्षी सादर होणारे हे नाटक म्हणजेच गावचा संपन्न सांस्कृतिक वारसा.