
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. मात्र निवडणुकीनंतर ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींशी वागत आहे. निवडणुकीपूर्वी सरसकट सर्व बहिणींना पैसे देण्यात आले. मात्र निवडणूक होताच लाडक्या बहिणींसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी कठोर निकष लावण्यात आले आहेत. आणखी चार लाख लाडक्या बहिणींचे लाभ बंद होणार आहेत. त्यामुळे सरकारचा कुटील हेतू चव्हाट्यावर येऊ लागला आहे, अशी टीका आता विरोधक करत आहेत.
याआधी योजनेचे निकष न पाळणाऱ्या 5 लाख महिलांचे अर्ज रद्दबातल करण्यात आले. आता आणखी चार लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या चारचाकी गाडी असलेल्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत. तसेच महिलांना एका वेळी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.
‘या’ महिलांना मिळणार नाही लाभ
- कुटुंबात चारचाकी वाहन असेल.
- महिला शासकीय नोकरीत असेल.
- परराज्यात विवाह करून स्थायिक असेल.
- अर्जावरील नाव आणि बँक खात्यावरील नावात तफावत असेल.
- ज्या महिलांचे आधार कार्ड योजनेशी लिंक नसेल
नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकत्रित 1500 रुपयांचा लाभ मिळेल. त्यापेक्षा अधिक पैसे मिळणार नाहीत. तसेच दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान लाभार्थी महिलांना बँकेत ई-केवायसी करुन हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे.