विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट दीड हजार रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील दोनच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनीही अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात ‘लाडकी बहीण योजने’त 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18 हजार कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.
आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्तीवेतन, चारचाकी वाहने आणि पाच एकरपेक्षा कमी जमीन असे सर्व निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील दोनच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली, त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्यावर येईल असा अंदाज आहे.
n मूळ योजनेत प्रत्येक कुटुंबातील दोनच महिलांना पैसे देण्यात येणार होते, पण निवडणूक तोंडावर असल्याने महायुती सरकारने कोणतीही खातरजमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले. सुमारे दोन कोटी 43 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंतच्या नऊ महिन्यांत सरकारी तिजोरीवर सुमारे 33 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.