
लाडक्या बहीण योजनेचा भार महायुती सरकारला सोसेनासा झाला आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या घटविण्यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा इन्कम टॅक्स रेकॉर्डही आता तपासला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलेय. आतापर्यंत साडेपाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई केवायसी करण्यात येणार आहे.
शेतकरी महिला, गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला, भाजीविक्रेत्या महिला यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र घरी चारचाकी गाडी आणि दरमहा चाळीस हजार पगार घेणाऱ्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आले आहे. त्यातील काही महिलांनी स्वतःहून आपली नावे मागे घेतली आहेत. त्यांना जो लाभ मिळाला आहे तो परत घेणार नाही. कारण भाऊबीज, रक्षाबंधनाला दिलेली भेट परत घेण्याची आपली संस्कृती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
लवकरच फेब्रुवारीचा हप्ता
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी गेल्या जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सात हप्ते जमा झाले आहेत. लवकरच फेब्रुवारीचा हप्तादेखील जमा होणार आहे असे अजित पवार म्हणाले.