विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना लक्ष्य करत सुरू करणयात आलेली लाडकी बहीण योजना आता महिलांच्या धास्तीचे कारण बनली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसकट सर्व महिलांना लाभ देण्यात आला. मात्र निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकारने आपला रंग बदलला आहे. लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांच्या कागदपत्रांची फेरतपासणी सुरू असून निकष पूर्ण न करणाऱ्या आणि बनावट कागदपत्रं सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट करत आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाने उगारलेला कारवाईचा बडगा पाहून बहिणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारवाईच्या धास्तीने काही बहिणी स्वतःहून हफ्ते नाकारत आहेत.
लाभ सोडण्यासाठी ‘असा’ करा अर्ज?
लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. काही महिलांनी आधीच लाभ सोडण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.