विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये दिले आणि निवडून आल्यानंतर ही रक्कम 2100 रुपये केली जाईल असे आश्वासनही दिले. पण प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सरकारने लाडक्या बहिणींना निकषाची कात्री लावली. एवढेच नाही तर आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल केले जाणार अशीही चर्चा आहे. याबाबत महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तकटरे यांनी शनिवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींची बोलताना भाष्य केले आहे.
अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल करणार का? असा सवाल आदिती तटकरे यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेद्वारे दिलेले पैसे परत घेण्याचा कोणताही विचार नसला तरी यापुढे निकषामध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी सरकारकडून अर्जांची पडताळणी सुरू आहे.
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांनीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार आहे. तसेच दुचाकी वाहनाच्या पलिकडे चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांनी आणि लग्न होऊन परराज्यात गेलेल्या महिलांनीही याचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व बाबींची पडताळणी सुरू असून काही महिलांनी आपणहून लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असे अर्ज केले आहेत. लाडक्या बहिणी प्रामाणिकही आहेत, असे आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, लाडक्या बहिणींच्या खात्यातून परस्पर पैसे परत घेणार नाही. परंतु निकषात बसल नसेल तर महिलांनी स्वत:हून पैसे परत करावेत. यासाठी संकेतस्तळावर स्वतंत्र लिंक टाकली असून चार ते साडे चार हजार महिलांनी या योजनेतून माघारही घेतली आहे. सरकारच्या पडताळणीतूनही अनेक महिला बाद होणार आहेत.
Ladki Bahin Scheme – लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, चार हजार महिलांनी केला अर्ज
जानेवारीचा हप्ता कधी?
दरम्यान, जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, जानवेरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना हप्ता दिला जाईल.