लाडकी बहीण हा मतांसाठी केलेला जुगाड, भाजप आमदाराच्या तोंडून सत्य बाहेर आलंच

महायुती सरकारने राज्यात आणलेली ‘लाडकी बहीण योजना’ हा एक जुगाड आहे. लोकांची मते मिळविण्यासाठी हा जुगाड केला आहे, अशी कबुलीच भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी दिली आहे. सावरकर यांचा यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ‘एक्स’वर भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या आमदाराने मान्य केलं की, महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माताभगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे.

 

व्हिडीओत काय?

एवढी मोठी भानगड कशासाठी केली? तुमच्या घरासमोर मतदानाची पेटी येईल तेव्हा या लाडक्या बहिणी कमळाला मतदान देतील. यासाठी हा जुगाड केला आम्ही. सगळे खोटं बोलतात, पण मी खरं बोलतो. हे गरीबांचं हाय की नाही? नाही तर सांगायचं एक आणि करायचं एक आम्ही काय रामदेवबाबांचे कार्यकर्ते आहोत, असं आमदार टेकचंद सावरकर एका जाहीर कार्यक्रमात मंचावरून बोलताना दिसत आहेत.