छत्रपती शिवाजी महाराज की जय! लडाखमध्ये चीन सीमेवर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशातील जनतेत स्वराज्याची धग निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात उंचावरील पुतळा लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ उभारण्यात आला आहे. भारतीय लष्कराने 26 डिसेंबर रोजी लडाखमधील पँगॉन्ग त्सो तलावाच्या काठावर 14,300 फूट उंचीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्याची स्थापना करत स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. तसेच देशाच्या मजबूत सीमा सुरक्षेचे प्रतीक आहे.

26 डिसेंबरला 14,300 फूट उंचीवर पँगॉन्ग त्सोच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शौर्य, दूरदृष्टी आणि अटूट न्यायाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा म्हणजे त्यांना मानाची आदराजंली आहे, अशी भावना लष्कराने व्यक्त केली आहे. लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला, SC, SM, VSM, GOC फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि कर्नल मराठा लाईट इन्फंट्री यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य, रणनीती आणि न्यायाची परंपरा आधुनिक लष्करी कारवायांमध्येही प्रेरणा देते. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने अनावरणाचा आनंदोत्सव साजरा केला. याबाबत ट्विट केले आहे की, पॅन्गॉन्ग तलावाजवळ 14,300 फूट उंचीवर स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. दररोज आपल्यासोबत राहणाऱ्या वारशाचा आपण सन्मान करत आहोत.

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव असताना पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. तलावाच्या काठावर स्थापित केलेला हा पुतळा भारताच्या वाढत्या पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक वर्चस्वाचे प्रतीक आहे. भारत आणि चीन यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये डेमचोक आणि डेपसांगमधून सैन्य मागे घेण्याचा करार झाला. तणाव कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपले जवान सतर्क आहेत आणि लडाखमधील पायाभूत सुविधा सतत मजबूत करत आहेत.

सीमेजवळ असलेल्या पँगॉन्ग लेकचा परिसर सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. भारतीय लष्कराने येथे आपले तळ मजबूत केले आहेत, ज्यामध्ये फायर अँड फ्युरी कॉर्प्सची भूमिका महत्त्वाची आहे.पँगॉन्ग तलावावरील त्यांचा पुतळा सैनिकांचे मनोबल वाढवत आहेच. तसेच देशाच्या ऐतिहासिक आणि लष्करी सामर्थ्याचेही ते प्रतीक आहे. हा पुतळा भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा अढळ आणि मजबूत असल्याचा संदेश देतो.