मजुरांची टंचाई; शेतकरी मेटाकुटीला, बटाटा काढणीसाठी मजूर मिळेना

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणीला वेग आला आहे. मात्र, मजूरटंचाईने उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचे दिसते. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे. मजूरटंचाईमुळे बटाटा काढणीसाठी मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

अजूनही काही शेतकरी यंत्राच्या साह्याने बटाटा काढण्याऐवजी आपल्या बैलजोडीच्या साह्याने लाकडी नांगरीने बटाटा काढणी करत आहे. बटाटा लागवड करताना अनेक शेतकरी सरी पद्धतीने बटाटा लागवड करतात. त्यामुळे बटाटा पिकाची चांगली वाढ होते. परिणामी उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. काढणी झालेल्या बटाट्याला बाजारात प्रतिदहा किलोला 120 ते 130 रुपये बाजारभाव मिळत आहे. तर, मॉलमध्ये बटाट्याची प्रतवारी पाहून प्रतिदहा किलोस 170 ते 190 रुपये बाजार मिळत असल्याचे शेतकरी गोरक्ष टाव्हरे यांनी सांगितले.

बटाटा लागवडीपासून ते काढणीपर्यंत बटाट्याची चांगली काळजी घेतली, तर चांगले उत्पन्न मिळत असल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण, बाजारभावात होणाऱ्या चढउताराने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्याच्या पूर्वभागातील निरगुडसर, काठापूर बुद्रूक, पोंदेवाडी, अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पारगाव, लाखणगाव, देवगाव व खडकवाडी परिसरात दोन्ही हंगामांसाठी बटाटा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. बटाटा पीक नगदी पीक म्हणूनही पाहिले जाते. बटाटा पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च येतो. बटाटा बियाणांच्या एका कट्ट्यापासून 15 ते 20 पिशवी गळीत म्हणजे बटाटा उत्पादन निघाले. एका पिशवीचे 50 ते 55 किलो वजन भरत आहे. बटाट्याचे पीक घेत असताना, बटाटा लागवडीपूर्वी नांगरट करून प्रती एकरी दोन ट्रॉली कोंबडी खत, शेणखत टाकून सरी पद्धतीने बटाटा लागवड केली जाते. लागवडीनंतर 90 दिवसांनी बटाटा काढणीला सुरुवात केली जाते.

“आंबेगाव तालुक्यातील रब्बी हंगामात लागवड झालेल्या बटाट्याची काढणी जवळजवळ संपली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी उशिरा केवळ दहा टक्के बटाटा लागवड झाली असून, त्याची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. आता महाराष्ट्रात नवीन बटाटा सध्या तरी येणार नाही, त्यामुळे यापुढील काळात उत्तर भारतातील बटाटा उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे.”

राजेंद्र भंडारी, व्यापारी, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती