
घरात अठराविश्व दारिद्र्य, आई आणि वडील दोघेही मजूर म्हणून लोकांच्या घरी काम करणारे. त्यामुळे यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण. हे सर्व पाहत लहानची मोठी झालेल्या गोपिका गोविंदने चिकाटीने अभ्यास करून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गोपिका गोविंद आता विमान कंपनीत हवाई सुंदरी झाली आहे. केरळच्या अलक्कोडे येथील कवूनपुडी येथील अनुसूचित जनजाती (एसटी) समाजातील आहे. तिला केरळच्या पहिली आदिवासी समाजातील हवाई सुंदरी बनण्याचा मान मिळाला आहे.
करिंबाला जनजातीत जन्मलेल्या गोपिका गोविंदचे बालपण अत्यंत कठीण परिस्थिती आणि गरिबीत गेले. तिचे वडील गोविंदन आणि आई व्हीजी हे दोघेही लोकांच्या घरी मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. आई-वडिलांसारखे कष्टाचे आयुष्य आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी गोपिकाने लहानपणापासून अभ्यास करायला सुरुवात केली. तिने लहान असतानाच आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी तिने हवाई सुंदरीचे होण्याचे निश्चित केले होते. हवाई सुंदरी होण्याचे ठरवले नाही तर त्यासाठी तिने कठोर मेहनत केली.
शिक्षणासाठी वाट्टेल ते
गोपिकाने केमिस्ट्रीमध्ये पदवी मिळवली. शिक्षणानंतर तिने घरखर्चासाठी नोकरी केली. केबिन क्रूची जाहिरात पाहिल्यानंतर गोपिकाने लहानपणी पाहिलेले हवाई सुंदरीचे स्वप्न पुन्हा एकदा जागे झाले. त्यानंतर तिने वायनाडच्या कल्पेट्टा येथील ड्रीम स्काय एविएशन ट्रेनिंग अकादमीत एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला. कोर्स संपल्यानंतर गोपिकाने मुलाखती देणे सुरू केले. पहिल्यांदा अपयश आले, परंतु तिने हार मानली नाही. दुसऱ्याच प्रयत्नात तिची निवड झाली. तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अखेर तिने पहिले उड्डाण केले.
गोपिका आदिवासी मुलींसाठी बनली प्रेरणा
तुमचे जर काही मोठे अधिकारी बनण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करा. त्यासाठी तुम्हाला कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवाय तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला काय बनायचे आहे, हे जगाला सांगत बसू नका. शांतपणे त्यावर काम करा. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळेल, असे गोपिकाने म्हटले आहे.